आत्मविश्वासाने आणि निर्धाराने केलेले कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल
युवा महोत्सव-2025 उत्साहात संपन्न

जालना/असलम कुरेशी
सध्याच्या काळात मुलींनी स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, त्यामुळे मुलींनी प्रथम स्वप्न पहावे आणि ते पुर्ण करण्यासाठी खंबीरपणे उभे राहणे प्रथमत: आवश्यक आहे. प्रत्येक मुलीने स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवून आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न करावेत. तरी आत्मविश्वासाने आणि निर्धाराने केलेले कठोर परिश्रम कधीही व्यर्थ जात नाहीत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव-2025 चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. यावेळी क्रीडा अधिकारी लता लोंढे, आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक आशिष जोगदंड तर परिक्षक म्हणून डॉ.शोभा यशवंते डॉ. मारोती घुगे, डॉ. दिगांबर दाते व डॉ.कन्नुलाल पिठोरे, यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, यशाला शॉर्टकट नसतो. कठोर परिश्रमाला कोणताही पर्याय नाही. आज जे कष्ट केले जातील, ते उद्या नक्कीच चांगले भविष्य घेऊन येतील. त्यामुळे 16-24 या वयातील विद्यार्थी जीवनातील जिद्दीने आणि मेहनत सातत्याने केल्यास यातून संपुर्ण जीवनभराची यशाच्या रुपाने शिदोरी प्राप्त होत असते. प्रत्येक मुलीने आपल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने आणि निष्ठेने काम करत रहावे, यशासाठी कष्ट करणे अनिवार्य आहे. “जर तुम्ही आज कष्ट सहन केले, तर उद्या नक्कीच चांगले भविष्य प्राप्त होईल,” असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. मुलींनी आत्मविश्वासाने कठोर परिश्रम करत आपले ध्येय साध्य करावे आणि उज्ज्वल भविष्याची निर्मिती करावी. काही अडचण असल्यास आपण सर्व मला जिल्हाधिकारी कार्यालयात भेटायला सुध्दा येवू शकतात, माझ्या कार्यालयात तुमचे नेहमी स्वागत आहे. असेही त्यांनी सांगितले.
युवकांमध्ये सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती आणि परंपरांचे जतन करणे, तसेच त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणे, या प्रमुख उद्देशांने युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवामध्ये यशस्वी होणारे स्पर्धक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पात्र ठरतात. या महोत्सवात समूह लोकनृत्य, लोकगीत, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, एकांकिका, विज्ञान स्पर्धा, कथालेखन तसेच इतर सांस्कृतिक आणि रचनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या युवा महोत्सवात 15 ते 21 वयोगटातील तरुण-तरुणींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. युवा महोत्सवात सादर झालेल्या विकी गणेश कुलकर्णी यांच्या “कुंभारापरी तू भिमा समाजाला घडविले”, तसेच राणी उंचेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी “कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची ” या गाण्यातील भावनात्मक आशय, शब्दांची ताकद आणि गायनशैली यामुळे श्रोते भारावून गेले. सर्व श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत गाण्याची प्रशंसा केली. युवा महोत्सव यशस्वीतेसाठी क्रीडा विभागातील संतोष प्रसाद, अमोल मुसळे, राहुल राठोड, राहुल गायके आणि हारुण शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.

