घनसावंगी तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या प्रतीक्षेत

घनसावंगी/अस्लम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान वाटप करण्याची घोषणा केली होती. परंतु शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित अनुदाना वाटप करण्याची मागणी होत आहे.
जूनमध्ये घनसावंगी तालुक्यातील रांजणी व परिसरात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारने जालना जिल्हा अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित केला. दुर्दैवाने, घनसावंगी तालुक्यातील चार मंडळांची नावे अतिवृष्टीच्या यादीत समाविष्ट नव्हती. परिणामी, शेतकऱ्यांनी संपूर्ण तालुका अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करावे या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन केले. यामुळे रांजणीसह संपूर्ण तालुक्याचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश झाला. सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला. बहुतांश शेतकऱ्यांना पेरणीसाठी मोठा खर्च करावा लागला. त्याचप्रमाणे अनेक शेतकरी कर्जमाफीच्या लाभांपासून वंचित आहेत. शिवाय, बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. विविध संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान वाटप करण्याची घोषणा केली होती. मात्र, दिवाळीनंतरही अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी, अतिवृष्टी अनुदान तातडीने वाटप करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

