हि बातमी ईतर भाषेत वाचा
कृषी व व्यापार

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात PM Kisan चा २१ वा हप्ता येणार? समोर आली नवीन अपडेट

मुंबई/विशेष प्रतिनिधी
देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेअंतर्गत २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आणि दैनंदिन गरजांसाठी दरवर्षी ६,००० रुपयांची थेट आर्थिक मदत देते. आतापर्यंत २० हप्ते वितरित झाले असून, लाखो शेतकरी आता २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत.
आचारसंहिता आणि हप्त्याचे वितरण
बिहारमध्ये सध्या निवडणूक आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांना शंका होती की, या काळात हप्ता जमा होईल का? मात्र मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहितेदरम्यान नवीन योजना सुरू करता येत नाही, मात्र पूर्वी मंजूर झालेल्या योजनांअंतर्गत देयके देण्यास निर्बंध नाहीत. त्यामुळे पीएम-किसान योजनेतील निधी थांबणार नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळेल याची खबरदारी घेणार आहे.
२१ वा हप्ता कधी मिळणार?
अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, कृषी विभागाच्या सूत्रांनुसार नोव्हेंबरच्या सुरुवातीला पैसे जमा होण्याची शक्यता आहे. मागील २० वा हप्ता ऑगस्ट २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरित केला होता. त्या वेळी ९.८ कोटी शेतकऱ्यांना, त्यात २.४ कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश, लाभ मिळाला होता.
साधारणपणे, पीएम-किसान योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
ई-केवायसी अनिवार्य
२१ वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून ओटीपी किंवा बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करावी. ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांचे पैसे थांबू शकतात. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तातडीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे कृषी मंत्रालयाकडून आवाहन करण्यात आले आहे.
हप्ता आला की नाही कसं तपासायचा?
शेतकरी आपल्या हप्त्याची स्थिती पीएम-किसान पोर्टलवर सोप्या पद्धतीने तपासू शकतात. https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जा. उजव्या बाजूला असलेल्या “Know Your Status” या पर्यायावर क्लिक करा. तुमचा नोंदणी क्रमांक भरा, कॅप्चा कोड टाका आणि “Get Data” निवडा. नंतर तुमच्या हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker