केवायसी बंद असल्याने शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित

रांजणी/असलम कुरेशी
शासनाने अतिवृष्टी अनुदान वाटपाला सुरुवात केली असली तरी मागील दोन महिन्यांपासून केवायसी बंद असल्याने बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ केवायसी सुरु करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
घनसावंगी तालुक्यातील रांजणी मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाच्या वतीने जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या यादीतून रांजणी मंडळाला वगळण्यात आले होते. प्रशासनाच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी दुधना नदीत जलसमाधी आंदोलन केले होते. त्यामुळे शासनाने रांजणी मंडळाचा अतिवृष्टी यादीत समावेश केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टी अनुदान वाटप करण्याचे जाहीर केले होते. परंतु दिवाळी होऊन एक महिना उलटला तरी देखील बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टी अनुदान मिळालेले नाही. मागील दोन महिन्यापासून केवायसी बंद असल्याने शेतकरी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित आहेत. पिकांच्या नुकसानीमुळे आधीच शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यातच रब्बीच्या पेरणीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. जेणेकरून शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे तात्काळ केवायसी सुरु करून शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान वाटप करण्याची मागणी होत आहे.

