शासकीय परिचारिका महाविद्यालयात पॉश कायदा व सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

जालना/असलम कुरेशी
शासकीय परिचारिका महाविद्यालय, जालना येथे महिला व मुलींच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी लैंगिक छळ प्रतिबंध (पॉश कायदा) आणि सायबर क्राईम संरक्षण या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर उपक्रम महिला समुपदेशन केंद्र, कदिम जालना पोलिस स्टेशन यांच्या वतीने राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एकनाथ गावडे, प्रमुख उपस्थिती डॉ. राजेंद्र शिंदे, तर आभारप्रदर्शन डॉ. शरद डिघे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व समुपदेशक रोहित म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना महिलांच्या सुरक्षिततेविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पॉश कायदा 2013 अंतर्गत खालील बाबींची माहिती देण्यात आली. यामध्ये कार्यस्थळी लैंगिक छळाची व्याख्या, तक्रार नोंदणीची प्रक्रिया व कालमर्यादा, अंतर्गत तक्रार समिती (आयसीसी) ची जबाबदारी, प्रतिशोधविरोधी संरक्षणाची तरतूद, महिलांना मिळणारा कायदेशीर व मानसिक आधार यावर देखील सखोल असे मार्गदर्शन झाले. तसेच सायबर क्राईमपासून संरक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुढील बाबींसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये फिशिंग, ओटीपी/ यूपीआय फसवणूक, सोशल मीडिया हॅकिंगची लक्षणे व संशयास्पद लिंक व कॉलची ओळख आणि त्यावरील प्रतिबंध आणि महिलांवर होणाऱ्या सायबर छळाची उदाहरणे व प्रतिबंधात्मक उपाय तसेच मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट सुरक्षितता उपाय याबरोबरच तक्रार नोंदणीसाठी cybercrime.gov.in पोर्टल तसेच स्थानिक सायबर सेलची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये ओटीपी/पिन, पासवर्ड इत्यादी गोपनीय माहिती कोणासही न देणे, संशयास्पद लिंक टाळणे आणि कोणताही छळ झाल्यास त्वरित तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमामुळे महाविद्यालयात महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्मिती व पॉश कायदा तसेच सायबर सुरक्षा विषयक जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

