जालना जिल्ह्याची सुधारित खरीप पिकांची पैसेवारी जाहिर
जालना/असलम कुरेशी
जिल्ह्यातील आठ तालुक्याची खरीप हंगाम 2024-2025 या वर्षाची खरीप पिकांची पैसेवारीमध्ये खरीप गावे व एकुण रब्बी गावांपैकी ज्या गावांमध्ये 2/3 पेक्षा जास्त खरीप पेरणी झाली असे एकुण 971 गावांपैकी 667 खरीप गावे व 298 रब्बी गावे असे एकुण 965 गावांची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. परतुर तालूक्यातील राणी वाहेगाव हे गाव पुर्णतः निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. तसेच मंठा तालुक्यातील चांदेश्वर व गोपेगाव हे गाव पुर्णतः निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे तसेच गारंटेकी, सोनुनकरवाडी आणि किर्तापुर तांडा या गावांना महसूल दर्जा प्राप्त नसल्यामुळे मंठा तालुक्यातील या 5 गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. जालना जिल्ह्यातील पैसेवारी जाहीर केलेल्या एकुण 965 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
खरीप पिकांची सुधारित पैसेवारी व गावांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. जालना तालुक्यातील 151 गावांसाठी 47.22 ऐवढी पैसेवारी जाहिर करण्यात आली आहे. तर बदनापूर तालुक्यातील 92 गावांसाठी 39.06, भोकरदन तालुक्यातील 156 गावांसाठी 44.40, जाफ्राबाद तालुक्यातील 101 गावांसाठी 48.90, परतूर तालुक्यातील 98 गावांसाठी 44.74, मंठा तालुक्यातील 117 गावांसाठी 47.63, अंबड तालुक्यातील 138 गावांसाठी 45.06 आणि घनसावंगी तालुक्यातील 118 गावांसाठी 45.84 याप्रमाणे पैसेवारी जाहिर करण्यात आली आहे.

