हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर, शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी कामे करताना सावधानता बाळगावी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना/असलम कुरेशी
जिल्ह्यात सध्या सर्वत्र ऊसतोडीचा हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापूरी मंडळात बिबट्याचा वावर असल्याचे वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जायमोक्यावर जाऊन स्थळ पाहणी केल्यानंतर लक्षात आले आहे. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी शेतातील कामे करतांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.


अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात मंगळवार दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मौजे पिठोरी सिरसगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्या वन्य प्राणी दिसला असल्याच्या माहितीवरुन वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जायमोक्यावर जाऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान बिबट्याचा या परिसरात वावर असल्याचे दिसून आले. हा वन्य प्राणी या भागात साधारण 10 किलोमिटरच्या परिघात वावरत असून सदर क्षेत्रात प्रामुख्याने ऊसाचे पीक दिसून आले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम चालु असल्याने बिबट प्राणी शेतकऱ्यांना दिसून येत आहे. सुखापुरी मंडळात सुखापुरी, वडीकाळ्या, एकनाथ नगर, वडीगोद्री, पिठोरी सिरसगाव, कारंजळा या गावांचा समावेश आहे. तरी या गावातील ग्रामस्थ, शेतकरी व ऊसतोड करणाऱ्या मजुरांमध्ये वन्यजीव बचाव टीमकडून वन्य प्राणी बिबटबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
ऊसतोडणी किंवा शेतीची कामे करताना शक्यतो समुहाने कामे करावीत. एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत. बिबट्या आढळुन आल्याने ऊसतोडणी सुरु असताना शेतकऱ्यांनी व मजुरांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे. गावाजवळ, शेतात किंवा गावठाण हद्दीत बिबट दिसल्यास बघण्यासाठी गर्दी करू नये. त्यांना दगड मारून पळविण्याचा किंवा मोबाईलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. जिल्ह्यात बिबट किंवा त्याची पिल्ले आढळल्यास तात्काळ संबंधित वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी विजय दौंड (मो.8262078886), वनपरिमंडळ अधिकारी बी.एम.पाटील (मो.9730414287) आणि वनरक्षक कैलास कदम (मो.9730131498) यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. असेही आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.
*वन विभागाकडून जनजागृती*
उंदीर, पक्षी, सरपटणारे प्राणी, डुकरे आणि कुत्रे हे बिबट्याचे खाद्य आहे. प्रत्येक बिबट्याला पोकळ ठिपक्यांची विशिष्ट रचना असते. त्यामुळे गावाजवळीत शेतात बिबट आल्यास त्याला बघण्यासाठी गर्दी करु नये, दगड मारुन त्याला पळविण्याचा प्रयत्न करु नये, पहाटे व सायंकाळी अंधारात गावाबाहेर व शेतात जाण्याचे काही काळ टाळावे, बिबट दिसताच जवळच्या वनरक्षक व चौकीदाराला कॉलकरुन माहिती द्यावी. पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावे. अचानक बिबट जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. बिबट्याला त्यांच्या मार्गाने जावू द्या, त्याला डिवचण्याचा प्रयत्न कदापी करु नका आणि तात्काळ वन विभागाला 1926 या क्रमांकावर संपर्क साधावा. याप्रमाणे अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळामधील गावागावात जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये वन विभागाचे सहायक वनसंरक्षक सुदाम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी विजय दौंड, वनपरिमंडळ अधिकारी बी.एम.पाटील, वनरक्षक कैलास कदम, श्री.शिंगणे, श्री.मिटके, श्रीमती जाधव, श्रीमती फड यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker