जालना जिल्ह्यातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जारी
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक-2025
जालना/असलम कुरेशी
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक -2025 साठी दि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. या कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर येथील नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणुका होणार असुन मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. निवडणुक कालावधीत कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी तसेच निवडणुक प्रक्रिया मुक्त व शांततामय मार्गाने होणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकारी, जालना यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान झालेल्या अधिकारानुसार जालना जिल्ह्यातील नगरपरिषद निर्वाचन क्षेत्रातील सर्व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य विक्री करणाऱ्या अनुज्ञप्त्यांचे (सीएल-2, सीएल-3, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, एफएल-4 आणि एफएलबीआर-2) व्यवहार दि.1 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतदानाच्या अगोदरच्या दिवशी संपुर्ण दिवस, दि. 2 डिसेंबर रोजी म्हणजेच मतदानाच्या दिवशी आणि दि. 3 डिसेंबर 2025 रोजी म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी संपुर्ण दिवस पुर्णत: बंद ठेवावी. असे आदेश जिल्हाधिकारी, जालना यांनी जारी केले आहेत.


