
छत्रपती संभाजीनगर/असलम कुरेशी
शेतकऱ्यांना हवामानातील बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने ‘महाविस्तार’ हे एआय प्रणालीवर आधारित ॲप विकसित केले आहे. ॲपवर शेतकऱ्यांसाठी मराठी माषेतील चॅटबॉट देण्यात आला असून या चॅटबॉटला शेतकरी प्रश्न विचारू शकतात, त्याची उत्तरे चॅटबॉट काही सेकंदात शेतकऱ्याऱ्यांना देतो. मातीपासून मार्केटपर्यंत आता सगळं काही एका ठिकाणी महाविस्तार ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे विभागातील सर्व शेतकरी बांधवांनी महाविस्तार ॲप Google Play Store मधून इन्स्टॉल करून वापर करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनिल वानखेडे यांनी केले आहे.
ॲप चालविण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे. फार्मर आयडी नसल्यास ॲप वापरता येणार नाही. फार्मर आयडीत शेतकऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक व बँक खाते, जमिनाचा सातबारा उतारा, शेतीचे क्षेत्रफळ व पिकांची माहिती, शेतकऱ्याने घेतलेले कर्ज किंवा विमा योजना आदीच्या नोंदी केल्या आहे.
महाविस्तार चॅटबॉट कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित संगणकीय प्रणाली आहे. यात मजकुराद्वारे किंवा आवाजाद्वारे संवाद करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. चॅटबॉटचा उपयोग विविध सेवांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मदत करण्यासाठी किंवा विशिष्ट काम पूर्ण करण्यासाठी केला जातो.
कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार एआय आधारित डिजिटल सल्लागार ॲप आहे. हे ॲप शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्वसमावेशक माहिती आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे यासाठी ‘वन स्टॉप सोल्यूशन’ म्हणून काम करते.
हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर नवनवीन आव्हाने निर्माण होऊ लागली आहेत, त्यामुळे हवामान बदलांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो, छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर- ११४२३, जालना-१५११३ व बीड- ५९८९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची कास धरली आहे.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका बजावत असलेले महाविस्तार AI आधारित ॲप शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरू लागले आहे, महाविस्तार ॲपमध्ये हवामान अंदाज, शेतीतील लागवड, लागवडीची पद्धत, कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाच्या पद्धती, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीक सल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती ॲपवर मिळते, असेही कृषी विभागाने कळविले आहे.



