सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन
घनसावंगी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी सोमवारी युवा शेतकरी संघर्ष समिती, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने रांजणी जवळील दुधना नदीवर जलसमाधी आंदोलन करण्यात आले.
घनसावंगी तालुक्यातील शेतकरी दरवर्षीच विविध प्रकारच्या दुष्काळाचा सामना करीत आहेत. घनसावंगी तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. परंतु प्रशासनाच्या अतिवृष्टीच्या यादीतून घनसावंगी मंडळ, राणी उंचेगाव मंडळ, पानेवाडी मंडळ व रांजणी मंडळाला वगळण्यात आलेले आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही वरील चार मंडळांचा अतिवृष्टीच्या यादीत समावेश न केल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. त्यामुळे घनसावंगी मंडळ, राणी उंचेगाव मंडळ, पानेवाडी मंडळ व रांजणी मंडळासह संपूर्ण घनसावंगी तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी सोमवारी युवा शेतकरी संघर्ष समिती, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांच्या वतीने रांजणी जवळील दुधना नदीवर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार पूजा वंजारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संतोष इथापे व तलाठी संतोष जैस्वाल उपस्थित होते. या जलसमाधी आंदोलनात युवा शेतकरी संघर्ष समिती, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनाच्या वेळी पोलिस निरिक्षक केतन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक किरण पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



