हि बातमी ईतर भाषेत वाचा
महाराष्ट्र

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ला 93 टक्क्यांहून अधिक उपस्थिती

मुंबई/असलम कुरेशी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) 2025 रविवार 23 नोव्हेंबर रोजी राज्यभरातील 37 जिल्हा मुख्यालयांवर सुरळीतपणे पार पडली. परीक्षेसाठी 1,423 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. राज्य तसेच जिल्हा नियंत्रण कक्षाच्या देखरेखीखाली परीक्षा विनाअडथळा सुरळीत झाली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आली. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या एकूण परीक्षार्थींची संख्या 4,75,669 होती. यापैकी 4,46,730 (93.91 टक्के) परीक्षार्थी उपस्थित होते.
परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यात सीसीटीव्ही, बायोमेट्रिक आणि एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. त्याचबरोबर उमेदवारांचे फोटो व नावे यांची पडताळणी करण्यात आली. बदललेले फोटो, वेगवेगळी नावे किंवा बोगस उमेदवार ओळखण्याची प्रणाली प्रभावी ठरली. सर्व परीक्षा केंद्रसंचालक, परीक्षा नियंत्रण कक्ष आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे इंटरनेट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे दिवसभर परीक्षा केंद्रांना सूचना निर्गमित करण्यात आल्या व त्यांचे काटेकोर पालन झाल्याचे परिषदेने स्पष्ट केले.
राज्याच्या कंट्रोल रूममधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील एका केंद्रावर दोन विद्यार्थी व बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर सहा विद्यार्थी चर्चा करून उत्तरे लिहीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे समवेक्षांद्वारे संबंधित आठ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरून बाहेर पाठविण्यात आले. तर समवेक्षांकावर रितसर चौकशी प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker