कुष्ठरोग शोध मोहीम प्रभावीपणे राबवा–मिन्नू पी.एम.
17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत होणार घरोघरी सर्वेक्षण, समाजात जनजागृती करण्याचे आवाहन
जालना/असलम कुरेशी
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम प्रभावीपणे राबवून जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण निर्मुलन करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान 2025 संदर्भात जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी श्रीमती. मिन्नू पी.एम. बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे सहायक संचालक डॉ. सुधाकर शेळके आदींची यावेळी उपस्थिती होती.
श्रीमती मिन्नू म्हणाल्या की, समाजात क्षयरोग कुष्ठरोगाविषयी मोठ्याप्रमाणात जनजागृती करावी, निदान न झालेल्या कुष्ठरुग्णांना लवकरात-लवकर शोधून त्यांच्यावर त्वरीत औषधोपचार सुरु करावा. नवीन संसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून औषधोपचारांद्वारे कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडित करुन होणारा प्रसार कमी करावा. कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण कमी करावे. तसेच क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. संशयित क्षयरुग्णाचे थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करुन क्षयरोगाचे निदान करावे आणि औषधोपचार सुरु करावेत. आरोग्य यंत्रणेला या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक ती मदत प्रशासनामार्फत करण्यात येईल. मात्र, आरोग्य यंत्रणेने ही मोहीम प्रभावीपणे पार पाडावी. त्याचबरोबर कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण निर्मुलनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचे नियोजन करुन कृती आराखडा सादर करावा, असे निर्देशही श्रीमती. मिन्नू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीच्या सुरुवातीला डॉ. शेळके यांनी उपस्थितांचे स्वागत करुन जिल्ह्यातील कुष्ठरुग्ण व करावयाच्या उपाययोजना, सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती सादर केली. यामध्ये जिल्ह्यातील सद्यस्थितीत करावयाच्या उपाययोजना कृती कार्यक्रमाचे नियोजन जिल्हास्तरीय कृती कार्यक्रम, तालुका समन्वय समिती, अभियानांतर्गत कार्यशाळा आशा, पुरुष स्वयंसेवकांचे प्रशिक्षण, मनुष्यबळ स्थिती अहवाल आणि शहरी व ग्रामीण भागातील सर्वेक्षणाचे नियोजन, सर्वेक्षण पद्धती आदींबाबत सादरीकरण केले. यावेळी बैठकीस तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.

