जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून डिजीटल युगास प्रारंभ, जिल्हाधिकाऱ्यांची भेट आता एका क्लिकवर
जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांसाठी तीन अभिनव माहिती तंत्रज्ञान उपक्रमाची सुरुवात

जालना/असलम कुरेशी
जालना जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि सक्षम तांत्रिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनाखाली हे उपक्रम विकसित करण्यात आले असून जिल्ह्याच्या डिजिटल युग प्रारंभ परिवर्तनातील हा महत्वाचा टप्पा मानला जात आहे. या उपक्रमांमुळे शासकीय कार्यालयातील कामे आता घरबसल्या तसेच अगदी कमी वेळेत पूर्ण करता येतील. नागरिकांनी या डिजिटल सुविधांचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि प्रशासनाच्या या डिजीटल प्रवासात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“मिट युवर कलेक्टर” या वेब-आधारित ॲपप्लिकेशनद्वारे नागरिकांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी ऑनलाईन स्लॉट बुक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे भेट प्रक्रियेचे पूर्वनियोजन, वेळेची स्पष्टता आणि तक्रार निवारणातील कार्यक्षमता वाढणार आहे. कृषी क्षेत्रासाठी सुरू करण्यात आलेल्या व्हॉट्सअप चॅटबोट “ऍग्रीपथ” (9172814066) च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेत रस्ता अतिक्रमणमुक्ती, नवीन शेतरस्ता प्रस्तावासाठी अर्ज तयार करणे, सरकारी सेवांची माहिती मिळवणे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधणे अशा सुविधा उपलब्ध होणार आहेत. “जालना मित्र” या सेवा चॅटबोटद्वारे (7387938774) नागरिकांना महा ई-सेवा केंद्रांच्या घरपोच सेवांसाठी अपॉइंटमेंट घेता येणार आहे. “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या या सेवेने नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या कमी होवून सेवा थेट घरपोच मिळण्यास मदत होणार आहे. या तीनही उपक्रमांची अंमलबजावणी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी उन्मेष सपकाळ आणि जिल्हा आयटी टीम यांच्या संयुक्त प्रयत्नांतून करण्यात आली आहे. हे तीन उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेत अधिकाधिक वृध्दी करतील आणि नागरिकांना संवाद साधणे अधिक सोपे होईल. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या माहिती तंत्रज्ञान आधारित सुविधा विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होईल आणि शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ पध्दतीने मिळण्यास मदत होईल.

