रांजणी रेल्वे स्टेशन व बस स्टँड मार्गाची दुरावस्था, वाहन चालकांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष
रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील रेल्वे स्टेशन व बस स्टँड मार्गाची दुरावस्था झाली असून वाहन खड्डयात जाऊन अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.

रांजणी रेल्वे स्टेशन व बस स्टँड मार्गावरून परिसरातील 35 ते 40 गावांतील वाहनांची वर्दळ असते. परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरांना जाण्यासाठी याच मार्गाने ये-जा करावी लागते. तसेच श्री सरस्वती भुवन हायस्कूलच्या जवळपास 2 हजार विद्यार्थ्यांना याच मार्गाने प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे विरेगांव फाटा ते राजा टाकळी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे. तसेच कुंभार पिंपळगांव ते रांजणी रेल्वे गेटपर्यंत या रस्त्याचे कामही झालेले आहे. परंतु विरेगांव फाटा ते रांजणी रेल्वे गेटपर्यंत रस्त्याचे काम न केल्याने या मार्गावर खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या खड्डयामध्ये पावसाचे पाणी साचते. जेणेकरून वाहनचालकांना खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. या मार्गाच्या दुरावस्थेमुळे वाहनचालकांसह नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.