शिक्षिकेच्या बदलीनंतर रांजणी जि.प. शाळेचे विद्यार्थी ढसाढसा रडले
रांजणी जि.प. शाळेतील शिक्षिका चिखलीकर यांची बदली

रांजणी/असलम कुरेशी
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका ज्योती चिखलीकर (हिरवे) यांची बदली झाल्यानंतर येथील विद्यार्थी भाऊक झाल्याचं पहायला मिळालं. मागील आठ वर्षांपासून या शिक्षिकेने येथील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले आहे.
खेडेगावातील लहान मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक करत असतात. घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील ऊसतोड कामगारांची मुलं, शेतमजुरांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतात. अशा मुलांना प्रसंगी शेतात जाऊन शाळेत आणून शिकवावे लागते. मागील आठ वर्षांपासून शिक्षिका ज्योती चिखलीकर (हिरवे) या रांजणी येथील जिल्हा परिषद शाळेत अध्यापनाचे कार्य करीत होत्या. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज मात्र त्यांच्या बदलीनंतर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. शिक्षिका ज्योती चिखलीकर (हिरवे) यांची रांजणी येथून आता येनोरा येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली आहे.
त्यामुळे त्यांना निरोप देताना अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी भावुक होऊन रडत असतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

