जालना जिल्ह्यात इंधनाबाबत निर्बंध, अफवांमुळे निर्माण झालेल्या गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासनाचा आदेश

जालना/असलम कुरेशी
जालना जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांकडून पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत असून, ठिकठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे मागणी व पुरवठा यामध्ये तात्पुरता असमतोल निर्माण झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक हित लक्षात घेऊन व इंधनाचा सुरळीत पुरवठा कायम राखण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून तातडीचे निर्बंध लागू केले आहेत.
नवीन आदेशानुसार, दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपयांपर्यंतच इंधन देण्यात येणार असून, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी ही मर्यादा 2000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. तसेच कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक गर्दी टाळून केवळ आवश्यकतेनुसारच इंधन घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
याशिवाय, प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज उपलब्ध साठा, प्राप्त साठा व मागणी केलेला साठा याची माहिती दर्शनी भागात फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, उल्लंघन करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सदर आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, पुढील आदेशापर्यंत तो लागू राहणार आहे.



